आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.४,
काकाचा जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या आठ वर्षाच्या चिमुरडीवर तामसवाडी, ता.पारोळा येथील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता रामेश्वर कॉलनीत घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर बलात्कार करणाºया नराधमाला नागरिकांनी चांगलेच चोपून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीत राहणारी या पीडित चिमुरडीला तिच्या आईने शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता त्याच परिसरात राहणाºया दिराचा जेवणाचा डबा देण्यासाठी पाठविले होते. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नसल्याने आई व शेजारील एक पुरुष तिच्या शोधासाठी गेले असता रस्त्यात ही चिमुरडी रडताना दिसली. तिला विचारपूस केली असता मला शाळेजवळ एक मुलगा भेटला व तो मुतारीत घेऊन गेला.तेथे त्याने अत्याचार केल्याची घटना पीडितेने कथन केली. हा प्रकार ऐकून आई थक्कच झाली. त्यांनी पीडितेला सोबत घेऊन अत्याचार करणाºयाचा शोध घेतला असता तो शाळेच्या परिसरातच आढळून आला. घृणास्पद कृत्याची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी त्याला चांगलाच चोपला. तर काही जणांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
जिल्हा रुग्णालयात वाद
दरम्यान, घटनेनंतर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक कविता भुजबळ यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा चौधरी यांच्या समक्ष पीडितेचा जबाब नोंदविला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या वेळी डॉ.प्रवीण पाटील व सामाजिक कार्यकर्ते भूषण सोनवणे यांच्यात वाद झाला. डॉक्टरने माफी मागावी म्हणून कार्यकर्ते अडून बसले होते. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला.
--