जळगाव : गिरणा नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल व पोलिस प्रशासनाकडून जोरदार कारवाईची मोहीम सुरु असून, बुधवारी सायंकाळी ६ वाजता तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दापोरा शिवारातून सुमारे ८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे.
तालुका पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अप्पासो पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वाघमारे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात असल्याने, वाळू माफियांनी काही ठराविक भागांमधून वाळू उपसा बंद करून, आता दापोरा, नागझिरी या भागांतून वाळू उपसा वाढविला आहे. त्यामुळे आता तालुका पोलिसांनी अनधिकृत वाळू उपशासह वाहतूक थांबविण्यासाठी रस्त्यांवर फिरते युनिट तयार केले आहे. बुधवारी दापोरा, धानोरा भागातील अनधिकृरीत्या वाळूचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात कारवाई करण्यात आली.
एरंडोल तालुक्यातून उपसा, साठा मात्र जळगाव तालुक्यात वाळू माफियांवर कारवाईचा बडगा वाढत असल्याने, आता वाळू माफियांकडून वाळू उपसा करण्याची नवीन शक्कल तयार करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा भागातून तराफ्याचा सहाय्याने थेट नदीच्या पाण्यातून वाळू उपसा करून, तो तरंगत्या बार्जद्वारे जळगाव तालुक्यातील धानोरा, दापोराकडे आणून त्या ठिकाणी वाळूचा साठा केला जात होता. नंतर रात्रीच्या वेळेस डंपर व ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक केली जात होती. याबाबतची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ६ वाजता धानोरा, दापोरा भागात जाऊन तराफ्यासह ७० ते ८० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. धानोरा भागातून वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर व बांभोरी भागातून रात्रीच्या वेळेस एक डंपर देखील तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.