जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून त्यापासून संरक्षण व्हावे यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या यंत्रणांना प्राधान्याने कोविड प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८० पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांनी लस घेतली असून त्यातील बहुतांश जण दुसऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे जिल्हा पोलीस दलात पुन्हा ५०५ अंमलदार बाधित झाले असून त्यापैकी ३० जण सद्य:स्थितीत उपचार घेत आहेत. ५५ अधिकारीही बाधित झाले असून तीन जण उपचार घेत आहेत. कोरोनाने जिल्हा पोलीस दलातील सात जणांचा बळी घेतला आहे.
स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्याला प्राधान्य देत पोलीस रस्त्यावर उतरत आहेत. पोलिसांच्या धाकाने का असेना नागरिक विनाकारण बाहेर फिरायला घाबरतात, त्यामुळे काही अंशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. सध्याच्या परिस्थितीत रोज ९०० ते ९५० च्या वर रुग्ण बाधित आढळून येत असून त्यात पोलीस अंमलदारांचाही समावेश आहे.
जिल्हा पोलीस दलात ३४१९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून त्यात ३२२३ अंमलदार तर १९६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी २६६६ अंमलदार तर १५५ अधिकारी अशा एकूण २८२१ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
दुसऱ्या टप्प्यातही २० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या आठवडाभरात या कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डी.एम. पाटील (गृह) यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण पोलीस -३२२३
लस घेतलेले पोलीस -२६६६
जिल्ह्यात एकूण पोलीस अधिकारी -१९६
लस घेतलेले पोलीस अधिकारी -१५५
७० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस
लस घेणाऱ्यांमध्ये महिला पोलिसांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. २५ टक्के महिलांनी कोविडची लस घेतली असून काही जण तर दुसऱ्या टप्प्यातील लसीला पात्र ठरले आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. त्यात बहुतांश महिला बाधितही झाल्या होत्या. लस घेण्यातही महिला पुढे आहेत.
दुसऱ्या डोससाठी पोलीस वेटिंगवर
पहिला डोस घेऊन ५० टक्के अंमलदारांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या डोससाठी हे अंमलदार व अधिकारी वेटिंगवर आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विशेष शाखा, मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखा व एसआरपीच्या पथकानेही पहिला डोस घेतलेला असून दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत. परिमंडळनिहाय अधिकारी व कर्मचारी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. कोविडबाधित, बरे झालेले, उपचार घेत असलेले तसेच लस घेतलेले, वेटिंगवर याची संपूर्ण माहिती उपअधीक्षक डी.एम. पाटील व एटीसीप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याकडे संकलित केली जात आहे.