जळगाव,दि.21- ‘मरिआईचा उदो उदो’, ‘भवानी माता की जय’ असा जयघोष करत तालुक्यातील आव्हाणे येथे मरिआई यात्रोत्सवानिमित्त गुरुवारी बारागाडय़ा मोठय़ा जल्लोषात ओढण्यात आल्या.
आव्हाणे येथे गेल्या 80 वर्षापासून मरिआईच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाडय़ा ओढण्याची प्रथा आहे. गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता वाजत-गाजत भगतांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मरिआई मंदिरात मरिआईच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. सायंकाळी 6 वाजता जल्लोषात बारागाडय़ा ओढण्यात आल्या.
भगत इगण रामा मोरे यांनी या बारागाडय़ा ओढल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य अॅड.हर्षल चौधरी, ग्रा.पं.सदस्य छगन पाटील, नामदेव पाटील, टिनू पाटील आदी उपस्थित होते. यात्रोत्सवानिमित्त आव्हाणे येथे पंचक्रोशीतील खेडी, आव्हाणी, वडनगरी, फुपनगरी येथील नागरिकांची गर्दी झाली होती.