जळगाव : जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झाले असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदानानंतरही उशिरापर्यंत मतदान सुरू होते. विशेष म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.४७ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा उत्साह होता व दुपारी दीडवाजेनंतर मतदानाची टक्केवारी अधिक वाढली. दरम्यान, सोमवार, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात मोठा उत्साह होता व दिवसेंदिवस निवडणुकीचा रंग चागलाच चढत गेला. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढती झाल्या. जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर माघारी दिवसापर्यंत ९३ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या होत्या.
जिल्ह्यात शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली. यामध्ये पहिल्या दोन तासातच सकाळी ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ११.५६ टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ते २२.२५ टक्क्यांवर पोहचले. यात पुन्हा वाढ होत होऊन दुपारी दीड वाजता ते ४८.३४ टक्के व दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६६.४७ टक्क्यांपर्यंत पोहचले.
सकाळी ११.३० ते दुपारी १.३० पर्यंत अधिक वाढले मतदान
सकाळी साडेसात ते ९.३० पर्यंत ११.५६ टक्के मतदान झाल्यानंतर साडेनऊ ते ११.३० वाजेपर्यंत १०.६९ टक्क्यांची वाढ होऊन मतदान २२.२५ टक्क्यांपर्यंत पोहचले. त्यानंतर ११.३० ते १.३०पर्यंत २६.०९ टक्क्यांची वाढ होऊन मतदान ४८.३४ टक्के झाले व दीड ते साडेतीनपर्यंत १८.१३ टक्के वाढ होऊन मतदान ६६.४७ टक्के झाले.
रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्र दाखल
मतदान केंद्रांवरून मतदान यंत्र घेऊन निघालेल्या बसेस त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पोहचल्या. जळगावात नूतन मराठा महाविद्यालयात जळगाव तालुक्यातील मतदान यंत्र दाखल झाले.
आता सोमवारकडे लक्ष
जिल्हाभरात झालेल्या मतदानांचे यंत्र दाखल झाल्यानंतर १८ जानेवारी रोजी मतदान यंत्रांचे सील उघडण्यात येऊन मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे सोमवारकडे लक्ष लागले आहे.