रावेर : तालुक्यातील दि २५, २८, ३० मे २ जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ८२५ घरांची पडझड होऊन ९३ लाख ७८ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तालुका प्रशासनाने केला. दरम्यान, दि. २५ ते ३० जून दरम्यानच्या केळीबागांच्या नुकसानीचा ५७.७१ कोटी रुपयांच्या पंचनाम्यांचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा आढावा तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, कृषी मंडळ निरीक्षक विजय महाजन यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्यासमोर सादर केला.
आमदार शिरीष चौधरी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने तालुक्यातील वादळी पावसाच्या आपद्ग्रस्त कालावधीत त्यांना पाहणी दौरा करणे दुरापास्त ठरले होते. त्यामुळे मंगळवारी आमदार शिरीष चौधरी यांनी तहसील कार्यालयात नुकसानीचा आढावा घेतला.
त्यात वादळी पावसाच्या तडाख्यात ८२५ घरांची पडझड होऊन घरसंसार उघड्यावर पडल्याने ९३.७८ लाख रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. जि.प. बांधकाम उपविभागीय अभियंता चंद्रकात चोपडेकर यांनी या नुकसानीचे मूल्यांकन करून ४३.६२ हजार रुपये अर्थसाहाय्य देय असल्याचा तांत्रिक अहवाल सादर केला आहे.
दरम्यान, दि. २५, २८, ३० जून दरम्यान झालेल्या केळीबागांच्या नुकसानीचा ५७.७१ कोटी रुपयांचा पंचनाम्यांचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. दि २ जूनच्या पहाटे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू असल्याची माहिती प्रशासनाने सादर केली. पंचनामे करताना आपद्ग्रस्त भागातील एकही शेतकरी सुटता कामा नये. तातडीने नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार शिरीष चौधरी यांनी दिल्या.
याप्रसंगी रावेर ग्रामीण रुग्णालयात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरसाठी आच्छादनासह तळ उभारून शीतकरणाची उपाययोजना करण्यासाठी ९० हजार रुपयांचा निधी अंदाजित खर्च करण्याचा तांत्रिक आराखडा सा. बां. विभागाने प्रस्तावित केला होता. मात्र कंत्राटदार राजेंद्र कोल्हे यांनी ना नफा ना तोटा या भूमिकेतून सामाजिक उत्तरदायित्व दाखवून २१ हजार रुपयांची बचत करून प्रशासनाला परत केल्याबद्दल आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा मेडिकल सेलचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.