ऑनलाईन लोकमत विशेष /सुनील पाटील
जळगाव, दि.12 - गुन्हेगारी नियंत्रण व गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवता यावे यासाठी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली. त्याअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचा:यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात पोलीस दलाने 827 गन्हेगार दत्तक घेतले. त्याचा परिणाम म्हणून मालमत्तेच्या गुन्ह्यात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात घट झाली.
तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात जून 2015 मध्ये ‘गुन्हेगार दत्तक योजना’ सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील 32 पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगार दत्तक घेतले होते. स्थानिक गुन्हे शाखेने शंभर गुन्हेगारांची जबाबदारी घेतली तर अन्य पोलीस स्टेशनने 727 गुन्हेगार दत्तक घेतले होते.
काय आहे नेमकी योजना़़़
या योजनेंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील अट्टल गुन्हेगार तसेच सुधारणाची वाव असलेले गुन्हेगार यांची माहिती घेतली जाते. संबंधित पालक अथवा बीट अंमलदार यांच्याकडून त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज भरला जातो. त्यात गुन्हेगाराचे मूळ गाव, सध्याचे राहण्याचे ठिकाण, परिवारातील सदस्यांची माहिती, त्याच्यावर दाखल गुन्हे व फोटो घेऊन प्रत्येक महिन्याला त्याची कार्यालयात बोलावून चौकशी करणे. त्यात तो महिनाभर कुठे होता याची माहिती घेतली जाते. त्याशिवाय आपल्या खब:यामार्फत त्याच्यावर लक्ष ठेवले जाते. सहा महिन्यात त्याच्यात काय सुधारणा झाली. त्याने काही गुन्हा केला का? याची माहिती घेतली जाते. या काळात त्याने पुन्हा गुन्हा केला तर संबंधित दत्तक पालक याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाते.
तत्कालिन पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी सुरु केलेली ही योजना अत्यंत चांगली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून योजनेचा आढावा घेतला. प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हेगारांच्या माहितीचा अल्बम आहे. त्याचे डिजिटायङोशन केले जाईल. त्यात गुन्हेगाराला केव्हा व कुठे व कोणी तपासले याची अचूक माहिती ठेवली जाईल, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
-बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक