मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील ८५१ शेतकरी डिमांड नोटची रक्कम भरूनही कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत. निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, परंतु महावितरणकडून अद्याप कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा या वर्षाचाही रब्बी हंगामही हातून जाणार आहे.शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महावितरणकडे अर्ज करीत आहेत. अडीच वर्षांच्या काळात ८५१ शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. महावितरणकडून त्यांना डिमांड नोटही मिळाली. या शेतकऱ्यांनी डिमांड नोटचे पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे.वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या या ८५१ शेतकऱ्यांना प्रत्येकी स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे. जेथे सोईस्कर राहील तेथे एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अधिक क्षमतेच्या एकाच रोहित्रावरून जोडणी दिली जाणार आहे. या सर्व प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या वीज जोडणीकरिता सांबांधित मक्तेदारांना कामे देण्यात आली आहे. जवळपास सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत.८५१ शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीजजोडणीसाठी मक्तेदारांना काम देण्यात आले आहे. जवळपास ९० टक्के ठिकाणावर कमी अधिक प्रमाणात खांब टाकणे, तारा ओढणे रोहित्र बसवणे अशी कामे सुरू आहेत.-ज्ञानेश्वर ढोले, उपकार्यकारी अभियंता, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील ८५१ शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 2:51 PM