चाळीसगाव : कोरोना महामारीत टाळेबंदी असताना न्यायालयाच्या आदेशान्वये उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एकवटले आहे. रविवारी १३ केंद्रांवर ८८ टक्के मतदान झाले. एकूण ४६८१ पैकी ४१२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया दुपारी ४ वाजता पार पडली. मातब्बरांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी उंबरखेडे येथेच मतमोजणी होणार आहे.गिरणा खोऱ्यात शिक्षण शाखा विस्तार असणाऱ्या सर्वोदयची स्थापना सहकारमहर्षी रामराव जिभाऊ पाटील यांनी केली होती. त्यांच्या नंतर दीर्घकाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदेसिंग पवार यांनी संस्थेवर नेतृत्व केले. संस्थेची बहुतांशी वेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. कै. पवार यांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने यावेळी चुरस निर्माण झाली होती.निवडणूक जाहीर झाल्यानंतर अक्रियाशील, क्रियाशील सभासदांचा वाद उफाळून आला. ६७० सभासदांचाही वाद थेट न्यायालयात पोहोचला. निवडणुकीचा आखाडा असा गाजत असतानाच कोरोनामुळे एका उमेदवाराचा मृत्यू झाला. निवडणूक महिनाभर लांबली. रविवारी शांततेत मतदान झाले.सुरक्षित अंतर पाळून मतदाननिवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी चोख नियोजन करीत कोरोना खबरदारी म्हणून सुरक्षित अंतर पाळून मतदानाची प्रक्रिया पार पाडली. सकाळी ८ वाजेपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या. प्रवेशव्दारावरच मतदारांचे तापमान मोजून मतदानासाठी सोडण्यात आले. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.१३ मतदान केंद्रे आणि झालेले मतदानउंबरखेडे येथे एकूण सहा मतदान केंद्रे होते. यात १५१३ मतदारांनी मतदान केले. सायगाव- ४६०, वरखेडे बु.- ४०३, धामणगाव- ३८१, कुंझर- ४५९, गुढे - ७२९, गुढे (खेडगाव)- १६० अशा १३ केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला१९ जागांसाठी मतदान झाले. ४५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दोन पॅनलमध्येच सरळ लढत झाली.संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पंडित पाटील, सचिव उदेसिंग मोहन पाटील, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र चुडामण पाटील, माजी पं.स. सदस्य व उंबरखेडेचे सरपंच केदारसिंग पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, चाळीसगावचे नगरसेवक भगवान पाटील आदी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.पहिला निकाल दुपारनंतरसर्वोदय शिक्षण संस्थेसाठी सोमवार, ३ मे रोजी सकाळी आठ वाजता उंबरखेडे येथीलच संस्थेच्या वसतिगृहातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिला निकाल दुपारनंतर लागेल. अगोदर राखीव मतदार संघातील निकाल लागतील. सर्वसाधारण मतदार संघासाठी सहा, तर राखीव मतदार संघासाठी चार असे १० टेबल मांडण्यात आले आहेत. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. २५ कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी दिली.
चाळीसगावच्या ‘सर्वोदय’च्या निवडणुकीत ८८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 10:35 PM