जळगाव : ऑरियन एफएक्स रोबो कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष दाखवून भूषण दत्तात्रय हाटे (रा.उदळी, ता.रावेर) या शेतकरी तरूणाची सायबर ठगांनी ९ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरूरन सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
१४ डिसेंबर २०२२ रोजी भूषण याला त्याचा मित्र शेजल वराडे याने ऑरियन एफएक्स रोबो कंपनीची माहिती दिली. या कंपनीत मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळतो, त्यामध्ये मी सुद्धा पैसे गुंतविले असून तू देखील पैशांची गुंतवणूक कर असे सांगितले होते. त्यानंतर त्याने संबंधित व्यक्तीचा नंबर दिला. त्याने भूषण याला कंपनीची माहिती देवून त्याच्या मॅनेजरचा मोबाईल क्रमांक दिला. मॅनेजरनेदेखील कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे सांगून पैसे भरण्यास सांगून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
भूषण यांनी ॲप डाऊनलोड करून वेळावेळी एकूण ९ लाख ३० हजार रूपये ऑनलाइन भरले. एके दिवशी ॲपवर लॉगिन केल्यानंतर त्यांना २४,९१५ डॉलरचा नफा झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. पण, रक्कम निघाली नाही. त्यामुळे भूषण यांनी गुंतवणूकीची माहिती देण्याऱ्या मॅनेजरला संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने दोन दिवसात तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले. दोन दिवस उलटूनही रक्कम खात्यावर आली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा संपर्क साधला पण, संबंधित व्यक्तीचा फोन बंद आला. ज्या व्यक्तीने त्याच्या मॅनेजरचा नंबर दिला, त्यालाही त्यांनी संपर्क साधला. मात्र, त्याचाही मोबाईल बंद आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री भूषण यांना झाल्यानंतर सोमवारी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात येत तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.