लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोटाचा गंभीर आजार त्याची शस्त्रक्रिया करावी लागत असतानाच कोरोनाची बाधा झालेल्या ९ महिन्याच्या चिमुकलीने २३ दिवसांनी ही लढाई जिंकत कोरोनावर मात केली आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असलेल्या या कुटुंबाला जननायक फाऊंडेशनने मदतीचा हात दिल्याने चिमुकली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून सुखरूप घरी गेली.
तांबापुरातील एका ९ महिन्याया बालिकेला यकृतात संसर्ग होता, शिवाय पोटाचा आजार असल्याने तिचे पाय सुजलेले होते. खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी बराच पैसा खर्च झाल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे होते. मात्र, बालिकेची प्रकृती गंभीर हेाती. अशातच कुटुंबीयांनी जननायक फाऊंडेशनचे फिरोज पिंजारी यांना संपर्क केला. त्यांनी तातडीेने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. मात्र, त्या ठिकाणी बालिकेची तपासणी केल्यानंतर ती बाधित आढळून आली आणि संकटे वाढली. जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्यासह फरीद खान यांच्यासह संघटनेच्या सदस्यांनी कुटुंबाला मदतीचा हात दिला. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात चांगले उपचार मिळाल्याने कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहे.
सुविधांसाठी चार ठिकाणी उपचार
कोविडबाधित असल्याने शस्त्रक्रिया होत नव्हती, अखेर एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र, अतिदक्षता विभाग लागत असल्याने दाखल कुठे करावे हा प्रश्न होता, त्यानंतर बालिकेला चार ते पाच दिवस डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील ८ ते १० दिवस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. १५ मे रोजी या बालिकेने कोरोनावर मात करून तिला डिस्चार्ज देण्यात आला. जननायक फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेत या बालिकेला सर्व रुग्णालयात हलविण्यात आले,