लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बाहेरील जिल्ह्यातील ९० रुग्ण हे जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत उपचार घेत आहेत. नियमित बाहेरील रुग्णांमध्येही वाढ होत असून रविवारी असे ९० रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ८३२ रुग्णांवर उपाचार करण्यात आले असून त्यापैकी ७३२ रुग्ण बरे झालेले आहेत. यात सुदैवाने बाहेरील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
दरम्यान, ओडिशा राज्यातील एक दाम्पत्यही नुकतेच शहरात बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असताना बाहेरील रुग्णांचीही यात भर पडत आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात तसेच गृह विलगीकरणात हे ९० रुग्ण उपचार घेत आहेत. सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान, ही संख्या अत्यंत कमी झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत ही संख्या वाढली आहे.