लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवारदरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. शुक्रवार व शनिवारी जळगावकरांनी या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला, तर कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारीदेखील शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, काही भागांमध्ये अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली तर अनेक रिक्षाचालकदेखील रविवारी शहरात फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोरोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. या कर्फ्यूदरम्यान तिन्ही दिवस शहरातील संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवार व शनिवारच्या तुलनेत रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकानेदेखील काही प्रमाणात बंद होती. मात्र पहिल्या दोन दिवसाच्या तुलनेत रविवारी मुख्य बाजारपेठ व शहरातील इतर रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ काही प्रमाणात वाढलेली दिसून आली. विशेषकरून सायंकाळी ५ वाजेनंतर शहरातील उपनगरांमध्ये गर्दी आढळून आली.
सुभाष चौक, भिलपुरा परिसरात भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी
शहरातील मुख्य बाजार पेठ भागातील सुभाष चौक, शिवाजी रोड, भिल पुरा या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली असल्याचे चित्र पाहायला मिळाली. भाजीपाला विक्रेत्यांची दुकान थाटल्यामुळे याठिकाणी भाजीपाला घ्यायला काही नागरिकांची गर्दी झाली होती. पोलीस व मनपा प्रशासनाकडूनदेखील रविवारी काही प्रमाणात कर्फ्यूमध्ये ढील दिल्याचे चित्र दिसून आले. यासह रामानंदनगर भागात व गणेश कॉलनी चौक परिसरातदेखील फळविक्रेते व इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली दिसून आली.
मनपाकडून कारवाई
अनेक भागात भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली असल्याची माहिती मिळताच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून सुभाष चौक भागात काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच बळीराम पेठ भागातूनदेखील काही विक्रेत्यांचे साहित्यदेखील जमा करण्यात आले. तसेच भाजीपाल्याची ने-आण करणाऱ्या मालवाहतूक रिक्षाचालकांवरदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागतर्फे कारवाई करण्यात आली.
रिक्षाचालक आले रस्त्यावर
जिल्हा प्रशासनाकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूदरम्यान महत्त्वाच्या मालवाहतुकीच्या वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनांना शहरात वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी अनेक रिक्षाचालकांनी जिल्हा प्रशासनाचा आदेशाला हरताळ फासून अनेक रिक्षा रविवारी रस्त्यावर फिरताना दिसून आल्या. तसेच अनेक रिक्षाचालकांनी मास्कदेखील लावलेले नव्हते.
सर्व मार्केटमधील व्यापाऱ्यांनी १०० टक्के दिला प्रतिसाद
जिल्हा प्रशासनाकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शहरातील सर्व मुख्य मार्केटमधील व्यापार्यांनी १०० टक्के प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. महात्मा फुले मार्केट असो वा गोलाणी मार्केट, सराफ बाजार असो वा दाणाबाजार सर्व बाजारांमधील दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देऊन कर्फ्यूच्या तिन्ही दिवशी आपले दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरातील तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प राहिली. मात्र व्यापारी बांधवांनी दिलेल्या प्रतिसादामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.