लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महात्मा गांधी यांनी १९२७ला खान्देशचा दौरा केला होता. त्यांनी १० फेब्रुवारीला जळगावला भेट दिली होती. त्यावेळी रेल्वे स्थानकावर जळगाव नगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता. जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम जीवराज अंजारिया हे यावेळी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या या मानपत्राची एक प्रत सध्या जळगाव शहरातील गांधी उद्यानात दगडात कोरून लावण्यात आली आहे. ९४ वर्षांपूर्वी गांधीजींनी जळगावसोबतच शहादा आणि दोंडाईचा या गावांनाही भेटी दिल्या होत्या. या आपल्या दौऱ्याचा उल्लेख त्यांनी यंग इंडिया या वृत्तपत्रातही केला आहे. त्यासोबतच गांधीजींनी त्यावेळी मानपत्र ठेवण्यासाठी मिळालेल्या एका लाकडी पेटीचाही लिलाव केला होता.
त्यावेळी जळगाव शहराची लोकसंख्या ही ३० हजारांच्या आसपास होती. शहरात १२ शाळा होत्या. त्यात अस्पृश्य आणि स्पृश्य किंवा कोणताही भेदाभेद नव्हता, तसेच त्यावेळीही जळगाव नगरपालिकेतर्फे दिले जाणारे प्राथमिक शिक्षण हे मोफत होते. याबाबतची सर्व माहिती आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा व्रताचे कौतुकही या मानपत्रात करण्यात आले आहे.