जळगाव - नवीन गटारी, रस्ते, उद्यानांचे सुशोभिकरण, स्मशानभूमी यासह प्रभाग निधीसाठी भरीव तरतूद करुन महापालिकेचा ९४६ सुधारित अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. महापौर जयश्री महाजन यांनी हा सुधारित अर्थसंकल्प महासभेत सादर केला. गेल्यावेळी आयुक्तांनी ८८६ कोटी ७५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात पदाधिकारी व नगरसेवकांनी अभ्यास करुन ६० कोटी रुपयांच्या कामांच्या काही सुधारणा सूचविल्या आहेत. सर्वानुमते हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
जळगाव महापालिकेची तहकुब विशेष महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. मागील सभेत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मंगळवारी सन २०२३-२०३४ साठी कुठलीही करवाढ नसलेले ८८६ कोटी ७५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. ३४ कोटी ७५ लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक होते.कुठलीही करवाढ नसल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
प्रथमच अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधीचा समावेश करण्यात आलेला आहे. खुले भूखंड, उद्याने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सर्व चौकातील सिग्नल यंत्रणा, अतिक्रमण, शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी उपाययोजना यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. शहरात सुमारे २२ किलोमीटरचे रस्ते दुभाजक आहेत. त्यावरील वृक्षारोपणाचा बोजवारा उडालेला आहे. त्यालाही लोकसहभागातून सुशोभित करता येणे शक्य आहे. शहरात लहान-मोठे ७८ चौक किंवा कॉर्नर आहेत. त्यावर फक्त जाहिरात व फलकच दिसतात. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत महापौरांनी मांडले. उपमहापौर कुलभूषण पाटील, नितीन लढ्ढा, ॲड.शुचिता हाडा व विशाल त्रिपाठी आदी सदस्यांनी सुधारणा सूचविलेल्या आहेत.
अशा आहेत काही महत्वाच्या सुधारणा
-सौरउर्जा प्रकल्पासाठीची तरतूद १ कोटीवरुन ३ कोटी-इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी १ कोटी-मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेसाठी १ कोटी-पिंप्राळा दिक्षाभूमीसाठी ५ कोटी-नवीन पुतळा उभारणी व दुरुस्तीसाठी २ कोटी-पिंप्राळा, मेहरुण भागात गुरांच्या गावहाळसाठी ५० लाख-स्मशानभूमी व्यवस्थेसाठी १० लाख-उद्यान सुशोभिकरण २५ लाख-रस्ते व्यवस्था व दुरुस्ती २ कोटी-व्यापारी संकुल व्यवस्था व दुरुस्तीसाठी ५ कोटी-नवीन गटारींसाठी ७ कोटी-नवीन इमारत बांधकामासाठी ४.५० कोटी-नवीन रस्त्यांसाठी २० कोटी-प्रभाग विकास निधी १२ कोटी