लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेतील ९७ कर्मचारी येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यात शिक्षण विभागातील सर्वाधिक ५६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी हे देखील सेवानिवृत्त होणार आहेत.
जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाजांवर सध्या कोविडमुळे बंधने आलेली आहे. यात बदल्यांची प्रक्रिया ही जूनपर्यंत स्थगित आहे. त्यातच १५ टक्केच उपस्थिती असून १ जून नंतरही यात काही मोठा फरक पडेल असे चित्र नाही, शिवाय जिल्हा परिषदेत येणाऱ्यांवरही बंधने घालण्यात आली आहेत. त्यातच आता येत्या ३१ मे रोजी सेवाकाळ संपलेले ९७ कर्मचारी हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कामांवरील बंधने अधिक वाढण्याची शक्यता आहे.
एसीईओपद पुन्हा रिक्त
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांची काही महिन्यांपूर्वी पूर्ण वेळ अधिकारी म्हणून या पदावर नियुक्ती झालेली हाेती. संजय मस्कर हे सेवानिृवृत्त झाल्यानंतर दीड वर्ष हे पद रिक्त होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार होता. आता गणेश चौधरी सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा हे पद रिक्त होणार आहे. याठिकाणचा प्रभारी पदभार कोणाकडे जाणार अद्याप तसे नियोजन झालेले नाही. यासह आता ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी हे पदही रिक्त होणार आहे. गणेश चौधरी यांच्याकडे हा प्रभारी पदभार होता.
अशा आहेत सेवानिवृत्ती
शिक्षणविभाग ५६
बांधकाम विभाग ११
ग्रामपंचायत विभाग ९
सामान्य प्रशासन विभाग ७
आरोग्य विभाग ६
पशुसंवर्धन ४
सिंचन विभाग १
महिला व बालकल्याण विभाग १
अर्थ विभाग १
कृषी विभाग १