३९ रुग्ण आयसीयूत
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपैकी ३९ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहे. ही संख्या कमी अधिक होत आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्यावर असलेल्या रुग्णांची संख्या ४७, वर पोहोचली आहे. तर लक्षणे विरहित रुग्णांची संख्या २७५वर पोहोचली आहे.
सात तालुक्यांमध्ये निरंक
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी सात तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण समोर आलेला नाही. जळगाव शहरात पाच, ग्रामीणमध्ये ६, भुसावळ ६, तर चोपडा, भडगाव, एरंडोल येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळूनआला आहे. अन्य जिल्ह्यांतील एका बाधिताचा समावेश आहे.
सिव्हिलमध्ये गर्दी वाढली
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नॉन कोविड सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर आता हळूहळू रुग्ण दाखल हाेत असून, रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी परिसरात नेहमीपेक्षा अधिक गर्दी झाली होती. सर्व सेवा नियमित सुरू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पार्किंग समस्या कायमच
जळगाव : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये पार्किंगची समस्या कायम असून, मंगळवारी या ठिकाणी बेशिस्त पार्किंगमुळे कर्मचाऱ्यांनाच वाहने काढण्यास मोठा त्रास सहन करावा लागला. चारचाकी वाहनांने मध्यभागी पार्क केली जात असल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
जळगाव ते शिर्डी पायी पालखी पदयात्रा रद्द
जळगाव : ओम साई मित्रमंडळातर्फे जळगाव ते शिर्डी पायी पालखी सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो, यंदा मात्र, कोरोनामुळे पायी पालखी पदयात्रा रद्द करण्यात आली आहे. यावर्षी पाच पावले पालखी काढण्यात आली. सकाळी बळीरामपेठेतील साईबाबा मंदिरात ९ जोडप्यांच्या हस्ते सामूहिक अभिषेक आरती करून त्यानंतर पालखीस प्रारंभ करून श्री दत्त मंदिरापर्यंत पालखी साई गजरात पदयात्रा करून परंपरा कायम ठेवण्यात आली. तेथून ही पालखी शनिपेठेतील किरण टेन्टहाउस येथे ४ जानेवारीपर्यंत मुक्कामी राहणार आहे. या पदयात्रेप्रसंगी विजय झंवर, किशोर देशमुख, महादू बोरकर, संजय टाक, सागर मणियार, तुषार सोनार, ललित परमार, गोपाल बारी, मुन्ना दलाल, दिनेश गवळी, सोमेश जाजू, राजू पाटील, आशिष पाटील, गजानन बोरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष रवींद्र हसवाल यांनी केले.