लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असला आहे. त्यातील ९९५ जणांच्या मृत्यूचे जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय ऑडिट आणि डेथ ऑडिट केले आहे. त्यात रुग्ण कोरोनाच्या संसर्गानंतर कितव्या दिवशी दाखल झाला, त्यावर कोणते उपचार करण्यात आले यासह विविध कारणांचा शोध घेण्यात येतो आणि नंतर ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.
गेल्या मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर एप्रिलमध्ये कोरोनाने पहिला बळी घेतला. त्यानंतर आतापर्यंत दोन हजार ५०० पेक्षा जास्त जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत ९९५ जणांच्या मृत्यूचे ऑडिट केले आहे. याबाबत डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, ‘यात संबंधित व्यक्ती रुग्णालयात कधी दाखल झाली होती, त्यानंतर त्यांच्यावर कोणते उपचार करण्यात आले, त्यांची लक्षणे काय होती किंवा उपचार आधी मिळाले असते तर त्याचा कसा फायदा झाला असता, यांचा ऊहापोह करण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
बहुतेक वेळा खासगी डॉक्टर कोरोनाची लक्षणे असतांनाही रुग्णांवर इतर आजारांचे उपचार करतात. त्याची देखील माहिती या अहवालात घेतली जाते. अशाच एका अहवालानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील १३ डॉक्टरांना नोटीस बजावली होती.