जळगाव : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये पुस्तक जमा करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडभाने (५२, रा. समर्थ कॉलनी, रामानंद नगर) याने विनयभंग केला. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातून जळगावात आजीकडे शिक्षणासाठी आलेली एक २० वर्षीय विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाल्यानंतर ही विद्यार्थिनी ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली. तेथे ग्रंथालय परिचर कैलास कडभाने याने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह केला. त्यास विद्यार्थिनीने नकार दिला तरी तो वारंवार पुस्तक नेण्याविषयी तिला सांगत होता. तेथे ही विद्यार्थिनी सही करीत असताना कडभाने याने तिला स्पर्श केला. चुकीने धक्का लागला असेल म्हणून विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले.
ग्रंथालयातून जात असताना कडभाने याने तिचे बोट पकडून दरवाजा मागे ओढले व तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तिने कशीतरी सुटका करून घेत घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर विद्यार्थिनीने शिक्षिकेलाही याची माहिती दिली. विद्यार्थिनी व पालक यांनी घाबरलेल्या अवस्थेत श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे जिल्हा प्रमुख गजानन माळी, शहर प्रमुख अशोक शिंदे यांना मदत मागितले. त्यांच्यासह समाजसेविका सुचित्रा महाजन, दीपक दाभाडे यांनी विद्यार्थिनीला हिंमत देत पोलिसांकडे तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यानुसार सदर विद्यार्थिनीने ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कैलास कडभाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.