- सुनील पाटील
जळगाव : समता नगरवासियांसाठी गुरुवार अर्थात दीप अमावस्या काळा दिवस ठरला. दहावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर लगेच काही तासातच अमोल ज्ञानेश्वर भाले (वय १५) या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत भरत रमेश आंबेकर (वय ४०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना तीन तासाच्या अंतरात घडल्या. मंगळवारी देखील रोहिदास भील उर्फ भगत (वय १७,रा.किनगाव, ता.यावल) या दहावीच्या विद्यार्थ्याचा ममुराबाद रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता.
अमोल भाले हा यंदा नववी पास झाला. गुरुवारी वडिलांनी त्याचा शाळेत दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यानंतर अमोल हा दुपारी गल्लीतील मुलांसोबत शिरसोली शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेला. तेथे पोहत असताना तो पाण्यात बुडाला. त्याला पोहता येत नव्हते, तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. हा प्रकार सोबतच्या मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी समता नगरात संपर्क साधून माहिती कळविली. नातेवाईकांनी त्याला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अमोल याचे वडील कंत्राटी सफाई कामगार आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ कोमल असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडील बाहेर बसलेले होते, घरात मुलाने घेतला गळफाससमता नगरातील वंजारी टेकडी भागात गुरुवारी दुपारी भरत रमेश आंबेकर (वय ४०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा वडील बाहेर बसलेले होते तर पत्नी बाहेर गेलेली होती. मुले शाळेत होती. भरत यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही, परंतु आजारपणाला कंटाळून त्यांनी जीवन संपविल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात वडिल रमेश आंबेकर, पत्नी सविता, मुलगा कल्पेश व किरण असा परिवार आहे. महिनाभरात समता नगरातील ही चौथी घटना आहे. रामानंद नगर पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.