जळगाव : पाचव्या मजल्यावर भींतीला प्लॉस्टर करत असतांना तोल जावून खाली पडल्याने शेख उस्मान शेख इस्माईल (वय ४०, रा.हुडको, पिंप्राळा) या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता गणेश कॉलनीतील चंद्रप्रभा सोसायटीत घडली. कामाला सुरुवात करतानाच ही दुर्घटना घडली.
गणेश कॉलनीली चंद्रप्रभा सोसायटीत टिल्लू शर्मा यांच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी रोज ठेकेदाराचे मजूर कामाला येतात. मंगळवारी सकाळी नऊ वाजता सर्व मजूर कामावर आले. प्रत्येकावर कामाची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. शेख उस्मान याला पाचव्या मजल्यावर भींतीला प्लास्टर करण्याचे तर शेख हुसेन हे शेजारीच बांधकाम करीत होते. प्लास्टरसाठी बाहेरुनच लाकडी पलक उभारण्यात आले होते. या पलकावरुन तोल गेल्याने शेख उस्मान थेट खाली कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. खाली इतर काम करीत असलेल्या लोकांना मोठा आवाज आल्याने त्यांनी धाव घेतली. तातडीने रिक्षातून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
पत्नीचे निधन, मुलं झाली पोरकीशेख उस्मान याच्या पत्नीचे निधन झालेले आहे. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. त्याच्या पश्चात आता तीन मुली, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. आई पाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाल्याने मुलं पोरकी झाली आहे. या घटनेचा नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. उस्मान हा खूप मेहनती व सर्वांमध्ये मिसळून राहणारा होता. बांधकामाच्या ठिकाणी मिळेल ते काम करुन मुलांचा उदरनिर्वाह भागवत होता.