अमळनेर (जळगाव) : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी बापाला येथील जिल्हा न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी मरेपर्यंत जन्मठेप, तीन वर्षे सश्रम कारावासासह व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना १३ फेब्रुवारी २०२० रोजी पारोळा तालुक्यातील एका गावात घडली होती.
पीडित मुलगी ही घरी एकटीच असताना तिचा बाप हा दारू पिऊन आला व त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. तिची आई त्यावेळी विवाह समारंभानिमित्त पिंप्री, ता रावेर येथे गेलेली होती. यानंतर पुन्हा १७ जून २०२० रोजी या वासनांध पित्याने मुलीवर दुसऱ्यांदा अत्याचार केला. यावेळी पिडितेची आई ही आरोपीच्या वडिलांचे निधन झाल्याने परंपरेप्रमाणे उत्तरकार्य संपल्यावर आपल्या माहेरी गेली होती.
याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार कलम ४(२)प्रमाणे मरेपर्यंत जन्मठेप व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार कलम ६प्रमाणे मरेपर्यंत जन्मठेप व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे शिक्षा तर भादंवि कलम ५०६ प्रमाणे ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. आरोपी हा अटकेपासून कारागृहातच होता.सरकारी वकील ॲड. किशोर आर. बागूल यांनी ११ साक्षीदार तपासले.