सुनील लोहार
कुऱ्हाड, जि. जळगाव : सांगवी शिवारातील शेतात मादी बिबट्या व तिची दोन पिल्ले आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी या शेताला वेढा घातला. त्यावेळी मादी बिबट्याने पिल्लांना सोडून पळ काढला. ही घटना बुधवारी सकाळी वरखेडी (ता. पाचोरा) शिवारात घडली.
सांगवी (ता. पाचोरा) येथील शेतकरी शशिकांत पाटील यांची वरखेडी परिसरात शेती आहे. बुधवारी सकाळी काही मजूर मका पिकाला पाणी देत होते. त्यावेळी त्यांना दोन बछडे व मादी बिबट्या दिसला. परिसरात याची माहिती होताच हे शेतशिवार लगेच निर्मनुष्य करण्यात आले तर मजूर धास्तीने घरी परतले.
सरपंच अधिकार पाटील यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. काही वेळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ताफ्यासह घटनस्थळी पोहोचले. यावेळी १०० ते १५० लोकांचा जमाव जमला होता. सर्वांनी मका पिकाच्या शेताला वेढा घातला. लोकांनी आरडा- ओरड केल्याने मादी बिबट्या पिल्लांना सोडून तिथून पसार झाला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधत बिबट्याला पकडण्याचे आदेश दिले. सोडून दिलेल्या पिल्लांना घेण्यासाठी बिबट्या परत येण्याची शक्यता असल्याने परिसरात पुन्हा भीती पसरली आहे.