प्रशांत भदाणे, जळगाव: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगाव) गावात ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी घडलेल्या दंगलीत महेश शिंपी नामक गरीब व्यक्तीचं फुटवेअरचं दुकान समाजकंटकांनी जाळून टाकलं. दुर्दैवी बाब म्हणजे त्यांच्या मुलीच्या हळदीच्या दिवशीच ही घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
समाजकंटकांनी दंगलीत महेश शिंपी यांचं फूट वेअरचं दुकान जाळून टाकलं. त्यामुळं त्यांचं अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं आहे. एकीकडे लाडक्या लेकीचं लग्न असल्यामुळे संपूर्ण शिंपी कुटुंब आनंदात होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लेकीच्या अंगावर अक्षदा पडण्यापूर्वीच त्यांची रोजीरोटी हिरावली गेली आणि त्यांच्यावर दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ आली.
पाळधी हे गाव मंत्री गुलाबराव पाटलांचं गाव आहे. या गावात ३१ डिसेंबरच्या रात्री किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल उसळली होती. मंत्री गुलाबराव पाटलांचे नातेवाईक कारने जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या तरुणांना पाहून त्यांच्या चालकाने हॉर्न वाजवला. त्याच कारणावरून तरुणांनी कारचालकाशी हुज्जत घालत पाटील कुटुंबीयांना शिवीगाळ केली. याच कारणावरून दोन गट आपापसात भिडले आणि मोठी दंगल उसळली. या दंगलीत समाजकंटकांनी अनेक दुकाने आणि वाहनांची जाळपोळ केली.
या दंगलीत महेश शिंपी यांचं बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर असलेलं दुकान समाजकंटकांनी जाळून टाकलं. दुकानासोबत शिंपी यांच्या स्वप्नांचीही राख रांगोळी झाली. दोन जानेवारीला त्यांच्या लेकीचं लग्न आहे. आता पाणावलेल्या डोळ्यांनीच त्यांना कन्यादान करावं लागणार आहे. या दंगलीत महेश शिंपी यांच्यासोबत अनेकांची दुकाने जळाली आहेत. एका रात्रीत सारं काही संपल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत.
दरम्यान, सरकारने घटनेचा पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आपल्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी महेश शिंपी यांनी केली आहे. किरकोळ कारणावरून उसळलेली दंगल अनेक कुटुंबांसाठी मोठं संकट घेऊन आली. आता सरकार महेश शिंपी यांना काय मदत करतं? हे पाहणं महत्त्वाचं असेल.