मोहन सारस्वत
जामनेर (जळगाव) : तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे तत्कालीन अव्वल कारकून एन. आर. शेख यांना ४ लाख ९९ हजार दंड करण्यात आला आहे. कामातील अनियमितता व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. याबाबत नगरसेवक शेख रिजवान अब्दुल लतीफ यांनी तक्रार दिली होती. संजय गांधी निराधार योजना समितीची मंजुरी न घेता परस्पर लाभार्थ्यांची नावे इतिवृत्तात समाविष्ट करण्यात आली. १३५ प्रकरणांमध्ये चुकीच्या पध्दतीने अनुदान वितरीत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले होते. आपण दाखल केलेली काही प्रकरण गहाळ झाल्याचे तक्रारदार यांनी या तक्रारीत नमूद केले होते. याबाबत तहसीलदारांनी शेख यांना नोटीसही दिली. शेख हे सध्या धरणगाव येथे पुरवठा निरीक्षक आहेत. या पार्श्वभूमीवर जामनेर तहसीलदारांनी संबंधित लिपिकाविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. संबंधित लिपिकाकडे निराधार वृद्धापकाळ, विधवा अपंग व राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना अनुदानाचे कामकाज होते.