वासेफ पटेल
भुसावळ जि.जळगाव - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात ८३ हजार फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ८१ लाखाची दंड वसूल करण्यात आला. यासाठी ६०० वर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा लावण्यात आला होता. याशिवाय रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५७३ प्रवाशांना ८७ हजारांचा दंड करण्यात आला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते, गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. तसेच सामान्य तिकीट घेऊन स्लीपर क्लासमध्ये प्रवास करतात. अशा प्रवाशांविरोधात विरोधात रेल्वेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
रेल्वे स्थानक परिसरात तसेच स्थानकावर उभ्या असलेले गाड्या व धावत्या गाड्यांमध्ये विविध पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. यात भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा तसेच विभागातील छोट्या स्थानकांचा समावेश आहे.
असे आहेत कारवाईचे आकडे
१) भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानक तसेच धावणाऱ्या गाड्यातून ८३ हजार ६०६ विना तिकीट प्रवासी तसेच सामान्य तिकिटावर स्लीपर व एसी क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून तब्बल ६ कोटी ८१ लाख ५४ हजार २७९ इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.२) याशिवाय रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५७३ जणांविरुद्ध ८७ हजार २९० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ. शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाणिज्य प्रबंधक ए.के. पाठक, मंडल मुख्य तिकीट निरीक्षक एन. पी. पवार, मुख्य तिकीट निरीक्षक वाय.डी. पाठक, डी.के. वर्मा, व्ही.एल.आठवले यांच्यासह तिकीट निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी यांनी ही कारवाई केली.