जळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील गणेश स्वागत मार्गांवर पडलेले खड्डे आणि खाली आलेल्या विद्युततारा गणेश मंडळांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहेत. महावितरण व महापालिका प्रशासनाने हे विघ्न तातडीने दूर करावे, अन्यथा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आपल्या पद्धतीने हा विषय हाताळेल, असा इशारा महामंडळाच्या बैठकीतून देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री आगमन नियोजन या विषयावरील बैठक रविवारी गायत्री मंदिरात झाली. बैठकीत श्रीच्या स्वागत मार्गावर उंच मूर्तींना वीजतारांच्या अडचणी, रस्त्यावरील खड्डे, जुन्या मंडळांना पंचवार्षिक परवानगीबद्दल मंजुरी, मंगळवारपासून सुरू होणारी एक खिडकी योजना याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा समन्वय बैठकीत मंडळांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले.
विविध उपक्रमांतील सहभागाची माहिती देण्यात आली. जे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत उपस्थित राहतील त्यांनाच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ पूर्ण सहकार्य करेल, अशी सूचनाही करण्यात आली. महामंडळाची पुढील बैठक दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. किशोर भोसले यांनी मार्गदर्शन झाले. याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.