जळगाव : मुलाखत झाली, सगळे सोपस्कार पार पडले मात्र, नोकरी द्यायची वेळ आली तर समोरील अधिकाऱ्याने चक्क कानावर हात ठेवले. कारण, काय तर उंची कमी आहे. ज्याच्यावर हा अन्याय झाला, तो पुन्हा जिद्दीने कामाला लागला आणि हवे असलेले स्वप्न साकार केले. आज तो स्वत:च्या एसयूव्हीमधून फिरतो. चाळीसगावच्या वाल्मीक जाधवची ही कथा आहे.
जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील मेकॅनिकल डिप्लोमाचा विद्यार्थी वाल्मीक जाधव २०१९ रोजी, महाविद्यालयातून पासआऊट झाला. त्यानंतर त्याने दोन महिने नोकरी केली. पुढील शिक्षणासाठी पुण्यातील सीओईपीमध्ये प्रवेश घेतला. तीन वर्षे कॉलेज केले. या दरम्यान एका तेल उत्पादक कंपनीत जागा निघाली. वाल्मीकने दोन महिन्यांत परीक्षेची तयारी करून १०० गुणांची परीक्षा दिली. परीक्षेच्या निकालातून १५ जणांची मुलाखतीसाठी निवड झाली. त्यांच्यातून तीन जण पुन्हा निवडले गेले. त्यामध्ये वाल्मीक जाधव होता. मुंद्रा येथे पाईपलाईन डिव्हिजनला नियुक्ती मिळाली आहे. नोकरीसोबत त्याचे शिक्षणही सुरू आहे.
वडील करतात सेंट्रिंग काम-
वाल्मीकचे वडील सेंट्रिंग काम करतात. घरी जेमतेम दोन बिघे शेतजमीन आहे. परिस्थितीमुळे वाल्मीकला नोकरी तातडीने मिळणे आवश्यक होते. त्याचे आई-वडील चाळीसगावला राहतात.
असाही अनुभव-
वाल्मीकने नोकरीसाठी देशातील एका नामांकित वाहन उत्पादक कंपनीत प्रयत्न केला होता. तेथे मुलाखत वगैरे सर्व काही झाले. नोकरी द्यायची वेळ आली, तर उंची कमी असल्याचे कारण देण्यात आले.
या स्पर्धेत उतरलो-
तेल कंपनीत पाईपलाईन विभागात नोकरी मिळाली. ही संधी दिव्यांग कोट्यातून मिळाली असली, तरी स्पर्धेत माझ्यासह एकूण चार जण होते. तिघांपेक्षा सरस ठरत नोकरी मिळवली आहे, असे वाल्मीक जाधव याने सांगितले.मी स्वत:ला वेगळा समजत नाही
माझी उंची ४ फूट ३ इंच असल्याने बाकीच्यांपेक्षा वेगळा असलो, तरी मी स्वत:ला तसे समजत नाही. फोर व्हीलर घ्यायचे माझे स्वप्न होते. आठ लाखांची एसयूव्ही घेतली आहे. उंचीनुरूप त्यामध्ये काही बदल करून घेतले आहेत. अशक्य कोणतीच गोष्ट नसते. फक्त सकारात्मक विचार करत राहा. मित्रांचा गोतावळा चांगला हवा. त्यांच्याकडून भरपूर मदत झाली. शाळा, महाविद्यालयात शिक्षकांनी सहकार्य केले.- वाल्मीक जाधव
वाल्मीक जाधव डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असताना नोकरीसाठी वेळोवेळी भेटायचा, दिव्यांग असल्याने आपले पुढे कसे होईल, या विचाराने सतत काळजीत असायचा. परीक्षा देताना त्याला जास्त वेळ दिला जायचा. पास होऊ की नाही म्हणून चिंतेत असायचा. परंतु त्याने प्रामाणिकपणा, जिद्द, आशावाद सोडला नाही.- प्रा. आशिष विखार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव