जळगाव : टास्क पूर्ण करून ‘पार्टटाईम कमाई’चे अमिष दाखवित जळगावातील पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची चार लाख ८९ हजार ४०० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. १४ एप्रिल ते २८ मेदरम्यान ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी विद्यार्थ्याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या विद्यार्थ्याची आई वकील आहे तर वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे.जळगाव येथे राहणारा २३ वर्षीय तरुण एम.ए.च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. १४ एप्रिल रोजी त्याला एका अनोळखी क्रमांकावरुन अमर्या पटेल नावाच्या तरुणीचा मॅसेज आला. तिने या तरुणाला तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकतात. त्यासाठी आमच्या कंपनीचे टास्क पूर्ण केले तर तुम्ही दररोज दोन ते १० हजार रुपये कमवू शकतात. त्यानंतर तरुणाला वेबसाईटवर टास्क दिले. त्याने ते पूर्ण केल्याने तरुणाच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे त्याचा विश्वास बसला. त्यानंतर अमृता जोशी नावाच्या महिलेने तरुणाला टास्क दिला. तो टास्क पूर्ण करुनदेखील त्याला पैसे मिळाले नाही. पुढील टास्क पूर्ण करावा लागेल, त्यासाठी पाच हजार रुपये भरा असे सांगितल्यानंतर तरुणाने पाच हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.त्यानंतरही टास्क पूर्ण करा अन्यथा पैसे स्टॉप होतील, पैसे टाकायला उशीर झाला, काही टास्कमध्ये लॉस झाला आहे तो भरावा लागेल, अकाऊंट स्टेबल करावे लागेल, असे वेगवेगळे कारणं सांगून या तरुणाकडून कधी पाच हजार, कधी १० हजार, ४९ हजार, ७२ हजार अशा प्रकारे प्रत्येक वेळी वाढीव रक्कम ऑनलाईन स्वीकारण्यात आली.
... तोपर्यंत भरलेली रक्कम मिळणार नाहीआता पैसे भरु शकणार नसल्याचे तरुणाने सांगितले असता जो पर्यंत तुम्ही पैसे भरणार नाहीत, तो पर्यंत तुम्हाला पैसे परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भरलेली रक्कम परत मिळण्यासाठी हा विद्यार्थी वेळोवेळी पैसे भरत गेला व सुमारे चार लाख ८९ हजार ४०० रुपये गमावून बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमर्या पटेल, मनोज कुमार, राघव दीक्षित, अमृता जोशी यांच्यासह अन्य एका जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.