अमळनेर, जि. जळगाव -
न्यायालयात खोटी माहिती पुरवून नऊ पैकी तीनच वारस दाखवून वारस दाखला घेतल्याचे न्यायालयाला उघडकीस आल्याने न्या एस एस अग्रवाल यांच्या आदेशाने जवखेडा येथील तिघांवर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील बाळकृष्ण नथु जोगी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात नऊ वारस होते. मात्र गावातील गावठाणातील सि स नंबर ८५ मधील बेघरांसाठी २०.०९ चौ मी प्लॉट साठी २०२० साली ज्ञानेश्वर बाळकृष्ण जोगी , राजेंद्र बाळकृष्ण जोगी व देवराम बाळकृष्ण जोगी यांनी तिघांनी अमळनेर न्यायालयात अर्ज करून वारस दाखला मिळवला होता. त्यानुसार त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात वारसाचे नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. परंतु भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी त्यांना नऊ वारस असल्याने पूर्ण वारसांच्या नावाचा दाखला आणा असे सांगितल्यांनंतर ज्ञानेश्वर जोगी यांनी ऍड व्ही वाय बडगुजर यांच्यामार्फत पुन्हा नऊ लोकांचा वारस दाखला मागण्यासाठी अर्ज केला. यापूर्वी वारस दाखला दिला असल्याची बाब न्या एस एस अग्रवाल यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी जुने प्रकरण मागवले. त्यात अर्जदारांनी फक्त तीन वारस असल्याचे खोटे कागदपत्रे जमा करून इतर सहा वारसदारांची नावे लपवली होती. म्हणून न्या अग्रवाल यांनी सहाययक अधीक्षक राहुल वसंत सपकाळे याना अधिकार देऊन पोलिसात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने ज्ञानेश्वर ,राजेंद्र आणि देवराम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.