सागर दुबे
जळगाव : रात्रीचे जेवण झाल्यानंतर मुलासोबत शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या वंदना सुभाष पवार (५६, रा. प्रोफेसर कॉलनी) या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रूपये किंमतीची तीन तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी लांबविली. शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रोफेसर कॉलनीतील वंदना पवार या शुक्रवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराजवळील जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील रस्त्यावर शतपावली करण्यासाठी मुलासोबत घराबाहेर पडल्या. डोक्यात टोपी आणि तोंडाला काळ्या रंगाचा मास्क लावून दोन तरूण दुचाकीवरून पवार यांच्याजवळ आले. त्यातील एकाने पवार यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकविल्यानंतर दोघा चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. मुलाने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे महामार्गाच्या दिशेने जोरात पळून गेले. अखेर शनिवारी सायंकाळी वंदना पवार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दीड लाख रूपये किंमतीची सोनसाखळी लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.