जळगाव :
शहरातून धरणगाव येथे घरी परतत असलेल्या ॲड. विवेक पाटील (वय ३३, रा. धरणगाव) यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडे आठ वाजता मानराज पार्क महामार्गालगत घडली. या अपघातानंतर तब्बल तासभर मृतदेह रस्त्यावरच पडून होता.
धरणगाव येथे ॲड. विवेक पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास होते. तसेच वकील संघाचे सदस्य होते. गेल्या तीन वर्षांपासून ते जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. ते दररोज दुचाकीने धरणगाव ते जळगाव ये- जा करत होते. काम आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे विवेक पाटील त्यांच्या (एमएच १९ सीएच १३९६) दुचाकीने धरणगाव येथे घराकडे निघाले असताना मानराज पार्कजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. धडकेनंतर विवेक पाटील हे रस्त्यावर पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की यात विवेक पाटील यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक हा घटनास्थळावरून पसार झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला, तेथून काही अंतरावर ॲड. वीरेंद्र पाटील हे वास्तव्यास आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मयताचे मोबाइल तसेच लायसन्स तपासले असता, ते त्यांचे मित्र ॲड. विवेक पाटील असल्याचे निष्पन्न झाले. पाटील यांनी माजी नगरसेवक अमर जैन, सामाजिक कार्यकर्ते आशिष पाटील, गौरव पाटील यांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केला.
दीड वर्षाच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले
मयत ॲड. विवेक पाटील हे जिल्हा वकील संघाचे सदस्य ही होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे. विवेक पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले असून त्यांच्या मोठ्या भावानेही चार ते पाच महिन्यांपूर्वी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली आहे. दोन वर्षांपूर्वीच ॲड. विवेक पाटील यांचा विवाह झाला आहे. वडील व भाऊ नसल्याने आई तसेच पत्नीची जबाबदारी ही विवेक पाटील यांच्यावरच होती. घरातील कर्ता पुरुष केल्याने त्यांच्या आईचा व पत्नीचा आधार हरपला असून दीड वर्षाच्या चिमुकलीचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.