भूषण श्रीखंडे
जळगाव : जळगाव विमानतळावरील ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी दुपारी दीड वाजता धावपट्टीवर उड्डाण घेत असताना विमानाचा पुढील बाजूचा लँडिंग गियर निखळल्याने विमान धावपट्टीवर घसरून अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव विमानतळावर हा पहिला अपघात झाला आहे.
जळगाव विमानतळावर ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्सिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. बुधवार (दि. १९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्हीटी-एलएवाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लँडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळले. वीस ते तीस फूट अंतरापर्यंत विमान धावपट्टीवर घसरत गेले. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाची एकच धावपळ उडाली. या घटनेत विमानातील प्रशिक्षणार्थी पायलट सुखरूप असल्याचे समजते.
धावपट्टीचे किरकोळ नुकसान
या अपघातात विमान धावपट्टीवर आदळले. त्यामुळे धावपट्टीवर एका ठिकाणी खड्डा पडला आहे तर वीस ते तीस फूट विमान धावपट्टीवर घसरत गेल्याने धावपट्टीचे किरकोळ नुकसान झाले.