जळगाव :
नाशिक येथून काम आटोपून दुचाकीने घरी येत असताना अज्ञात वाहनाने उडविल्याने गोकुळ रामदास बारी उर्फ फुसे (वय ३४, रा.शिरसोली प्र.न.) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री १२.३० वाजता महामार्गावर बांभोरी गावापासून काही अंतरावर झाला. याप्रकरणी पाळधी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ हा सीसीटीव्ही कॅमेरे व इतर इलेक्ट्रॉनिक्सचे कामे करीत होता. याच कामासाठी तो सोमवारी दुचाकीने (क्र. एम.एच १९, बी.टी १९८२) नाशिक येथे गेला होता. तेथून दोन वाजता घरी परत येण्यासाठी निघाला. बांभोरी गावाच्या अलीकडे रात्री साडे बारा वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोकुळ याच्या हेल्मेटसह डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी काही लोकांच्या मदतीने गोकुळ याला १ वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी शिरसोली गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोकुळ याला कोणत्या वाहनाने धडक दिली हे अजून स्पष्ट झालेले नाही. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या काळात कोणते वाहने गेली यावरुन वाहन निष्पन्न करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी ‘लोकमत’ ला दिली. गोकुळ याच्या पश्चात आई लताबाई, वडिल रामदास बारी, पत्नी माया, मुलगी कृतिका (वय ७), जागृती (वय ४) व लहान भाऊ रवींद्र असा परिवार आहे. रवींद्र रिक्षा चालक आहे. गोकुळ घराचा कर्ता पुरुष होता.