जळगाव : काही दिवसांपूर्वी उसनवारीने घेतलेले ७ लाख रूपये परत न दिल्याच्या कारणावरून सनी इंद्रकुमार साहित्या (२७, रा. सिंधी कॉलनी) या तरूणाचे सागर सैंदाणे व शेखर सपकाळे यांनी चारचाकीतून येवून अपहरण करून जैनाबाद येथील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर चॉपर आणि बेसबॉल बॅटचा धाक दाखवून धमकाविल्याचा प्रकार गुरूवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शुक्रवारी साहित्या याच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील सिंधी कॉलनीमध्ये सनी इंद्रकुमार साहित्या हा तरुण वास्तव्यास असून तो वडीलांसोबत दुकान चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. सनी याला पैशांची गरज असल्याने त्याने जैनाबाद येथील सागर सैंदाणे याच्याकडून दि. ६ मार्च रोजी ७ लाख रुपये उसनवारीने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये त्याने दि. १८ मार्च रोजी त्याला रोख स्वरुपात परत केले आहे. दि. २३ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सनी हा घरी असतांना त्याला सागर सैंदाणे याने फोन करुन तू मला पुणा-गाडगीळ येथे भेटायला ये असे सांगितले. त्यानुसार सनी हा लागलीच त्याचा मित्र पियुष मंदान याला सोबत घेवून पुणा-गाडगीळ येथे आला. काही वेळानंतर सागर हा त्याच्या चारचाकीतून (एमएच.०९.एफबी.७७२७) त्याठिकाणी आला. त्याने सनीचा हात पकडून तू गाडीत बस, असे बोलून त्याला गाडीत बसविले. आपण जेवणासाठी बाहेर जात असल्याने सांगून सनी सोबत असलेले आकाश दुबे, आदर्श पुरोहीत, पियूष मंदान यांना सुद्धा त्यांनी चारचाकीत बसविले. नंतर शेखर सपकाळे याने चारचाकी भरधाव वेगाने जैनाबादच्या दिशेने पळविली.
उसणे पैसे कधी देणार...दरम्यान, जैनाबादच्या दिशेने चारचाकी सुसाट जात असताना आम्हाला कुठे नेत आहात, असे सनी म्हणाला. त्यावर सागर याने 'तुझ्याकडे असलेले माझे उसणे पैसे तू परत कधी करणार आहेस, माझ्या आईसोबत दोन मिनिटे बोलण्यासाठी तुला घेवून जात आहे, असे सांगून त्याने जैनाबादच्या घरी त्याला घेवून जावून चौथ्या मजल्यावर डांबून ठेवले. त्यानंतर धारदार चॉपर व बेसबॉलच्या बॅट दाखवून तुझ्या वडीलांना फोन करुन सांग की, पैसे घेवून या असे धमकाविले. त्यावर सनी याने लागलीच त्याच्या वडीलांना फोन करुन मला बळजबरीने अटकावून ठेवले असून तुम्ही ऐकटे येवू नका, त्यांच्याकडे धारदार हत्यारे आहे असे सांगून कुटूंबियांना बोलवून घेतले. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
वडीलांसह गाठले पोलिस ठाणे...घटना घडल्याच्या दुसर्या दिवशी सनी हा वडीलांना घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आला. रात्री घडलेला संपूर्ण प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्याच्या तक्रारीनुसार सागर सैंदाणे व शेख सपकाळे या दोघांविरुद्ध अपहरण करुन डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.