- विजयकुमार सैतवालजळगाव : देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात असून, दीड वर्षात राज्यातील ठिकठिकाणच्या १० शहिदांच्या कुटुंबीयांना आर्या फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली आहे. यात आता ७ आॅगस्ट रोजी काश्मिरात शहीद झालेल्या कौस्तुभ प्रकाशकुमार राणे या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना ६५ हजारांचा धनादेश देण्यात येणार आहे.देशवासीय सुरक्षित राहावे म्हणून भारतीय सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागातील सीमांवर रात्रं-दिवस जीवाची बाजी लावून पहारा देत असतात. यात त्यांना वीरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाऊंडेशन ही संस्था सरसावली असून, शहीद कुटुंबीयांना मदत म्हणून ६५ हजार रुपयांची मदत करीत आहे.राणे कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न७ आॅगस्ट रोजी पहाटे उत्तर काश्मीमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मीरा रोड (ठाणे) येथील रहिवासी असलेले कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्या वेळी दीडच दिवसात ६५ हजार रुपये जमा झाले व त्याचा धनादेश तयार करून डॉ. पाटील यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यानुसार हे पदाधिकारी शहिद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करणार आहेत.यांना केली मदतसंदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, जि. नाशिक), विकास कुळमुथे (नेरळ, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती), चंद्रकांत गलंडे (जाशी, ता. माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता. मिरज), सुमेध वामन गवई (लोणाग्रा, जि. अकोला), रवींद्र धनावडे (मोहटमेळा, जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार (म्हसरुळ, जि. नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाणे, जि. धुळे), कौस्तूभ राणे (मिरा रोड, ठाणे) या शहिदांच्या कुटुंबीयांना फाउंडेशनच्यावतीने मदत करण्यात आली आहे.राज्याच्या काना-कोप-यात पोहोचली मदतगेल्या दीड वर्षांपासून फाउंडेशनच्यावतीने ही मदत केली जात असून आता पर्यंत राज्यातील नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, शिंदखेडा इत्यादी ठिकाणच्या शहीद कुटुंबीयांच्या मदत करण्यात आली आहे.आवाहनाला दात्यांचा प्रतिसादकोणत्याही भागात जवान शहीद झाल्यानंतर ही भर कधीही निघू शकत नाही, मात्र शहिदांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील हे शहीद जवानाचे छायाचित्र व मदतीविषयीचा संदेश सोशल मीडियावर पाठवितात. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत दाते सढळ हाताने मदत करीत असल्याचा सुखद अनुभव फाऊंडेशनला येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. स्वखर्चाने पोहोचतात पदाधिकारी राज्यात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मदतीसाठी जावे लागले त्या ठिकाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने पोहोचतात, हे विशेष.देशासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने आपण ही मदत देत असतो.- डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन, जळगाव.
शहिदांच्या कुटुंबीयांना जळगावातून मदतीचा हात, आर्या फाऊंडेशनचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 3:38 PM