जळगाव : दिल्ली, गुजराथ, गोवा यासह बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोनाच्या पार्शभूमीवर तपासणी करुनच त्या प्रवाशाला बाहेर सोडण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. मात्र, हे आदेश मनपा आरोग्य विभागाने धाब्यावर बसविले आहे. प्रवाशांच्या तपासणीसाठी स्टेशनवर नियुक्त केेलेले आरोग्य पथकच गायब असल्याने सोमवारी रात्री बाहेरगावाहून आलेले हजारो प्रवासी तपासणीविना घराकडे रवाना झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिकीट निरीक्षकांसमोर हे सर्व घडत असतानांही, त्यांनी आपल्याला काहीही माहित नसल्याचे सांगत हात झटकले आहे.
शासनाने दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरात या ठिकाणी विमानाने व रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कोरोना चाचणी करुनच बाहेर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विमानतळावर जिल्हा आरोग्य विभागातर्फे तर जळगाव रेल्वे स्टेशनावर मनपा आरोग्य विभागातर्फे तपासणी पथकाची नियुक्ती केली आहे. सोमवारी रात्री नऊ ते साडेनऊ च्या सुमारास या पथकातील एकही कर्माचारी स्टेशनावर हजर नव्हता.
विना तपासणीच प्रवाशी स्टेशनाबाहेर
सोमवारी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान मुंबई हावडा एक्सप्रेस व एका कोविड स्पेशल गाडीतून मोठ्या संख्येने प्रवासी जळगाव स्टेशनवर उतरले. मात्र, मनपाचे तपासणी पथकच जागेवर नसल्यामुळे सर्व प्रवासी विना तपासणीचेच स्टेशनाबाहेर पडले.
तिकीट निरीक्षकानेही दाखविला बेजबाबदारपणा
प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी सोमवारी रात्री रेल्वे स्थानकावर तिकीट निरीक्षक कमलेश चौधरी यांची नियुक्ती होती. कमलेश चौधरी यांचा आरोग्य पथकाच्या शेजारीच टेबल असून, त्यांच्या समोरच आरोग्य पथकाचे कर्मचारी जागेवरून गायब झाले. यामुळे विनातपासणी होताच प्रवासी बाहेर जात होते. त्यामुळे चौधरी यांनी याबाबत या पथकाच्या कर्मचाऱ्यांना किंवा मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी असे काहीही न करता, या प्रकाराकडे दुर्लक्ष केेले. तसेच `लोकमत` प्रतिनिधीने याबाबत विचारले असता, आपल्याला माहिती नसल्याचे सांगत हात झटकले.