लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या ११७ व्या अखिल भारतीय आगा खान हॉकी स्पर्धेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. या स्पर्धेला शासनाच्या आदेशान्वये परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हॉकी असोसिएशनचे सचिव प्रा.डॉ. आसिफ खान यांना दिले आहे.
हॉकी असोसिएशनला ही स्पर्धा घेण्याची परवानगी याआधी जिल्हा प्रशासनाने दिली होती. निवासी उप-जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी हे पत्र खान यांना दिले होते. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित केली जाणार होती; मात्र नंतर क्रीडा संकुल समितीचे सचिव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी शासनाच्या आदेशान्वये क्रीडा स्पर्धांवर बंदी असल्याने आयोजन करता येऊ शकत नसल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांना कळवले. त्यानुसार हे आदेश देण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या बाहेरुन खेळाडू येणार आहेत व त्यातून संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याबाबतचा लेखी अहवाल जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सादर केला आहे.
शासकीय स्पर्धेसाठी मात्र आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी ही स्पर्धा होऊ नये, यासाठी जरी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असले तरी लगेच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केंद्रीय क्रीडा नियामक मंडळातर्फे होणाऱ्या स्पर्धेत अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेसाठीचे प्रस्ताव मुंबई येथे पाठवले जाणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेची निवड चाचणी होणार आहे आणि मग संघ स्पर्धेत खेळेल.
त्यांना कोरोनाची भीती नाही का?
अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी जातील; मात्र त्यावेळी त्यांना कोरोनाचे कारण पुढे केलेले नाही. त्या ऐवजी उलट आवाहन करून प्रस्ताव मागवले जात आहेत. मग आताच अखिल भारतीय आगा खान हॉकी स्पर्धेसाठीच कोरोनाचे कारण पुढे का करण्यात आले. त्यातदेखील नियम पाळणार असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांतर्फे सांगण्यात येत होते. आता शासनाच्या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्यांना कोरोनाची भीती नाही का? असा प्रश्नदेखील हॉकी प्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.