लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलीस ठाण्यात पडून असलेल्या बेवारस व अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मालकांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे बेवारस वाहनांची ओळख पटवून आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन प्रशासनाने आहे, तर मुदतीत कागदपत्र सादर न केल्यास त्या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यांकडून देण्यात आली आहे.
शहरातील एमआयडीसी, शनिपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या सात ते आठ वर्षांपासून शेकडो वाहने बेवारस पडून आहे. यात काही वाहने गुन्ह्यात जप्त केलेली आहे. दरम्यान, या वाहनांचे मालक मिळून येत नसल्यामुळे वाहने पडून आहे. आता या बेवारस दुचाकींच्या मालकांचा पोलीस ठाण्यांकडून शोध घेतला जात आहे. दुचाकींची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस ठाण्यांकडून करण्यात आली असून, पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डवर वाहनाचा प्रकार, वाहनक्रमांक, इंजिन नंबर तसेच चेसिस क्रमांकाची यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित दुचाकीमालकांनी ओळख पटवून दुचाकी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, मुदतीत कागदपत्र न सादर केल्यास वाहनाचा लिलाव केला जाईल, असेही पोलीस ठाण्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी आहे बेवारस वाहनांची संख्या
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारात १७ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात ७६, तर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ३५ वाहने बेवारस पडून आहेत. या वाहनांच्या मालकांनी मालकी हक्काबाबतचे मूळ कागदपत्र सादर करून आपले वाहन घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.