जळगाव : उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत एप्रिल व मे या दोन महिन्यात जिल्हाभरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठीच्या धान्यादी मालाचे १ कोटी ८३ लाखांचे बिल ठेकेदाराने सादर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत़ मात्र, या प्रकारात तातडीने तपासणी करून ते मंजूरही करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत़दुष्काळी भागांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्येही शाळांमध्ये पोषण आहार सुरू ठेवावा, असे आदेश होते़ मात्र, जिल्हाभरातील शाळांमध्ये विद्यार्थीच येत नसल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी विविध संघटना, शिक्षकांकडून झाली होती़ अनेक वेळा शिक्षक शाळेत जायचे मात्र, विद्यार्थीच नसल्याने ते बसून होते, केंद्र प्रमुखांच्या संघटनेनेही सुट्या देण्याची मागणी केली होती़तांदूळ वगळता केवळ धान्यादी मालाचे १ कोटी ८३ लाखाची बिले गुनीना कमर्शियलने सादर केली आहे़ यावर सुरूवातीला शंका आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ बी़ एऩ पाटी लयांनी दहा टक्के शाळांच्या पावत्या तपासणीचे आदेश दिले होते़ मध्यंतरीच्या काळात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक ड्युटी होती, तरीही या पावत्या तपासणीचे काम अगदी महिनाभरात आटोपल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे़ ठेकेदाराने जून, जुलै या महिन्याचेही तीन कोटींच्यावर बिले सादर केली आहे़ एप्रिल- मे मध्ये जरी पोषण आहार शिजला नसला तरी तो पुढील कालावधीसाठी घेतला जातो, असा दावा शिक्षण विभागाकडून झाला मात्र, पुढील महिन्याचेही तीन कोटी बिल निघाल्याने यावर सर्वच अवाक झाले आहेत़ या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आता समोर आली आहे़ जिल्ह्यातील २७५० शाळांमध्ये पोषण आहार योजना राबविली जाते, त्यापैकी काही शाळांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आहार दिल्याचा दावा शिक्षण विभागाकडून झाला आहे़विविध संस्था, संघटना, शिक्षकांनी विद्यार्थी येत नसल्याने हा पोषण आहार सुट्ट्यांमध्ये बंद करावा, अशी मागणी केली होती़ मात्र तरीही ऐवढे बिल निघणे म्हणजे हा ठेकेदारासाठी निर्णय राबविल्याचे यावरून स्पष्ट होते़- रवींद्र शिंदे, माहिती अधिकार कार्यकर्ते
अबब.... सुट्यांंमध्ये पावणे दोन कोटींचा पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 9:59 PM