अगोदर भीती, नंतर लागतो लळा : विश्वासू प्राणी म्हणून अनेक घरांमध्ये घेतली जाते काळजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : छंदाला मोल नसते, असे नेहमी म्हटले जाते. त्यात ज्या छंदापासून आपली सुरक्षा जपली जात असेल तर त्याकडे अधिकच ओढा राहणे साहजिक आहे. अशाच प्रकारे दिवसेंदिवस अनेकांकडे पाळीव कुत्रे वाढू लागल्याचे दिसून येत आहे. पाळीव कुत्र्यांमध्येही सध्या वेगवेगळ्या जातीच्या व त्यातही प्रशिक्षित श्वानांना पसंती वाढत आहे. विदेशी जातीच्या कुत्र्यांची मागणी वाढण्यासह त्यांची किंमतही पाहिली तर ती लाखाच्या घरात आहे. इतकेच नव्हे त्यांचा खर्चही महिन्याकाठी १० हजाराच्या जवळपास होतो. मात्र तरीदेखील अनेक जण कुत्रे पाळण्याचा छंद जोपासत आहेत.
दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या घटना, घरातील सर्वांची सुरक्षा या सर्वांचा विचार करता अनेकांच्या घरासमोर श्वान बांधलेले दिसते. उच्च मध्यम वर्गीय, श्रीमंतांकडे तर हे प्रमाण अधिक वाढले आहे. घरात एकाला श्वानाची आवड असली व इतर सदस्य घाबरत असले तरी नंतर त्यांनाही श्वानाचा लळा लागत असल्याचे अनेकांनी सांगितले.
या पाच कुत्र्यांना शहरात सर्वाधिक मागणी
जर्मन शेफर्ड : १८,०००
जळगाव शहरात सर्वाधिक मागणी आहे ती जर्मन शेफर्ड या श्वानाला. त्याची किंमत १७ ते १८ हजार रुपये असून त्याहीपेक्षा अधिक किमतीचे या जातीचे श्वान असतात. मात्र आपल्याकडे वरील किमतीमधील श्वानांना मागणी असते. याचा महिन्याचा खर्च ८ ते १० हजारपर्यंत असतो.
लॅब्रोडॉर : १५,०००
शहरात दुसऱ्या क्रमांकाची पसंती आहे ती लॅब्रोडॉरला. याची किंमत १५ हजारांपासून पुढे असते. याला खाद्य जास्त लागते, त्यामुळे त्याचा खर्चही महिन्याला १५ हजारांपर्यंत जातो.
डॉबरमॅन :१४,०००
सुरक्षेच्या दृष्टीने डॉबरमॅनला अधिक पसंती दिली जाते. याची किंमत १४ हजारांपासून पुढे असून याचा महिन्याचा खर्च १० हजारांपर्यंत असतो.
पग : १७,०००
शहरात या श्वानाची पसंती चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची किंमत १७ हजार रुपये आहे. याचा महिन्याचा खर्च आठ हजारांपर्यंत येतो.