बडनेरा : मुंबईहून कुटुंबासोबत अकोल्याकडे पायी येत असताना जळगावमध्ये अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अमरावती-अकोला महामार्गावरील लोणी टाकळीनजीक सापडली. यात आरोपी पसार झाला असून, अल्पवयीन मुलीला जळगाव पोलीस घेऊन गेले आहेत. पोलीस सूत्रानुसार, मुंबईच्या मुलुंड भागातील एक कुटुंब मिळेल त्या वाहनाने, तर कधी पायी अकोला येथे येण्यास निघाले होते. त्यावेळी, या मुलीचे अपहरण झाले होते.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मजुरी करणाऱ्या या कुटुंबातील १७ वर्षाचा मुलगा व १३ वर्षाची मुलगी यांना एका व्यक्तीने दुचाकीवर बसविले. ऊन अधिक असल्यामुळे कुटुंबीयांनीदेखील होकार दिला. काही अंतरावर दुचाकीस्वाराने मुलाला उतरविले. पुढे पोलीस असल्याने तू चालत ये, असे तो म्हणाला. मात्र, बरेच अंतर गाठल्यानंतरही बहीण व लिफ्ट देणारा युवक दिसत नसल्याने ही सर्व घटना मुलाने आई-वडिलांना सांगितली. त्यांनी तात्काळ नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, सदर मुलगी महामार्गावरील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर फिरताना दिसली. या मुलीला लोणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणातील आरोपी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे. गणेश सखाराम बांगर (३२) असे त्याचे नाव आहे. या मुलीला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन.के. भोई यांनी दिली.