विलास बारीजळगाव : बंदिश 'सांवरे सलोने से लागे मोरे नैन", "माझे माहेर पंढरी" या अभंगाने शास्त्रीय गायन मैफलीत स्वरांची अनुभूती जळगावकरांनी घेतली. सोबतच रागा फ्युजन बँडच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय तालवाद्य एकमेकांत मिश्रण करीत सादर करून अभिजात संगीताच्या आविष्काराचा आगळावेगळा आनंद रसिकांना कलावंतांनी करून दिला.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २२व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांनी स्वरांचा अनुभव घेतला. गुरुवंदना वरुण नेवे यांनी सादर केली. सूत्रसंचालन दीप्ती भागवत यांनी केले. यावेळी मधुमती जैन, डॉ. शिल्पा बेंडाळे, अनदान देशमुख, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे सी. एस. नाईक, डॉ. योगेश टेनी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, ॲड. सुशील अत्रे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचे स्वागत करण्यात आले.
शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची मेजवानी
पंडिता रोंकिणी गुप्ता यांनी राग बिहागमध्ये बडा ख्याल "कैसे सुख सोये शाम मूरत चित चधी" हा विलंबित एकतालात निबद्ध ख्यालाचे शास्त्रीय गायनाची सुरवात केली. "माझे माहेर पंढरी " या अभंगाने आपल्या मैफलीची सांगता केली. रोंकिणी यांना तबल्याची साथ आशिष राघवानी यांनी दिली, तर संवादिनीवर साथ दीपक मराठे यांनी केली. तानपुरावर अनघा गोडबोले व रश्मी कुरमभट्टी यांनी साथ संगत दिली.
रागा बँडच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध
रागा फ्युजन बँडच्या माध्यमातून सांगीतिक आविष्काराची एक वेगळीच अनुभूती रसिकांना बालगंधर्व महोत्सवात घेता आली. सप्तसुरांप्रमाणे सप्त कलावंत एकत्रितरीत्या हा आविष्कार बालगंधर्व महोत्सवात करून दाखविला. राग हंस ध्वनी ने रागा फ्युजन बँडची सुरवात झाली. 'अलबेला सजन’ या गाण्याने रसिक स्वरात हरवले. तालवादक जयंत पटनाईक, अमृतांशू दत्ता स्लाइड गिटार, गायक अजय तिवारी यांच्या प्रभाव पूर्वक सादरीकरणाने रसिक भारावून गेले.