जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश चिटणीसपदी नियुक्त केले होते. मात्र महानगराध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर नाराज झालेल्या अभिषेक पाटील यांनी चिटणीसपद नाकारत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत कुरबुरींनंतर जयंत पाटील यांनी अभिषेक पाटील यांना महानगराध्यक्ष पदावरून दूर करीत प्रदेश चिटणीसपदी नियुक्त केले. अभिषेक पाटील यांच्याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवरून त्यांची महानगराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या अभिषेक पाटील यांनी जयंत पाटील यांना पत्र पाठवून प्रदेश चिटणीसपद नाकारले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ज्यांनी गेल्या काळात पक्ष जिल्ह्यात संपविला होता, त्यांचे ऐकून पद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. या काळात स्थानिक नेत्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. स्थानिक नेत्यांच्या तक्रारींमुळे आपण पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो. तरी संघटनेच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात यावे. यापुढे कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी अभिषेक पाटील यांच्याबाबत कायमच तक्रारी केल्या होत्या. सुमारे दीड महिना आधी मुंबईत झालेल्या बैठकीतदेखील वाद उफाळून आला होता.