दिवाकर देव यांच्या प्रथम स्मृती दिनाबद्दल त्यांनी लिहिलेल्या कविता व रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन सोमवारी सायंकाळी महाबळ येथील हतनूर हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, मु. जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक शरदच्चंद्र छापेकर, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर व जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव उपस्थित होते. यावेळी ‘अबोध अवकाश’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी दिवाकर देव यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरत अमळकर यांच्या हस्ते झाले.
दिवाकरांच्या कवितांमधून माणसाचे अचूक निरीक्षण -
यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात, दिवाकर देव यांच्या कवितांमधून माणसाचे अचूक निरीक्षण व निदान केले आहे. ते त्यांच्या कवितेच्या प्रत्येक ओळीतून आणि चित्रांमधूनही दिसत असल्याचे सांगितले. दिवाकरांचे व्यक्तिमत्त्व खूप विलक्षण होते, प्रत्येकाच्या भावना ते जपायचे, कौतुक करायचे, अतिशय हसतमुख त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगत, त्यांच्या सोबत घालविलेल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
तसेच यानंतर भरत अमळकर यांनीही दिवाकर देव यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, देव यांनी विविध ठिकाणी केलेल्या आर्किटेकच्या कामांमुळे स्वत:चे एक समाजात वलय तयार केले होते. ते नेहमी आनंदी रहायचे, इतिहास व चित्रकला एकत्रितरीत्या सादर करणे हा त्यांचा आवडीचा विषय असल्याचेही अमळकर यांनी सांगितले. अनिल राव यांनी दिवाकर देव यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला असून, गेल्या वर्षी २६ डिसेंबरला आमच्या घरी आले होते. तीच आमची शेवटची भेट झाली असल्याचे राव यांनी सांगितले. त्यांच्या कवितांमधून त्यांची आठवण नेहमी सोबत राहणार असल्याचेही राव यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी दिवाकर देव यांच्या देश-विदेशातील मित्रांनी दिवाकर यांच्याबद्दल व्यक्त केेलेल्या भावना यावेळी डिजिटल स्क्रीनद्वारे दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहा पाटील यांनी केले तर आभार रेणुका जोशी यांनी मानले.