मुक्ताईनगर : यंदाच्या आषाढी वारी नियोजनासंदर्भात संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासह महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या सहा पालखीप्रमुखांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पुणे येथील विभागीय कार्यालयात बैठक होत आहे. यात आषाढी वारीबाबत काय निर्णय होतो, याकडे भाविक वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही दुसरी आषाढी वारी आहे. यावेळी तरी शासनाकडून प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारीस दोन लस घेतलेल्या भाविकांना परवानगी मिळावी, ही माफक अपेक्षा वारकरी संप्रदायातील मंडळींनी व्यक्त केली आहे. याविषयी मानाचे पालखी सोहळे संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत तुकाराम महाराज (देहू), संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर), संत एकनाथ
महाराज (पैठण), संत सोपानदेव महाराज (सासवड), संत मुक्ताबाई महाराज (कोथळी-मुक्ताईनगर) यांच्या प्रमुखांनी दोन वेळा बैठक घेऊन शासनाकडे वारकरी, फडकरी, मानकरी यांच्या भावना लक्षात घेऊन पायी वारीचा आग्रह धरला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीत अजित पवार यांच्याकडे हा आग्रह धरला जाणार आहे.
१४ जूनपूर्वी निर्णय व्हावा
संत मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान १४ जून रोजी होणार आहे. शासनाकडे पायीवारीसह इतर मागण्या केलेल्या आहेत. सोहळा तयारीसाठी या बैठकीत आषाढी वारीसंदर्भात निर्णय होणे महत्त्वाचे आहे. निदान १४ जूनपूर्वी पूर्ण वारीचे स्वरूप स्पष्ट करण्याचा उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह करू, असे मुक्ताबाई संस्थानचे ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.