नशिराबाद : येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतरासाठी उद्घोषणासुद्धा झाली असून मंजुरीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागून असताना शासनाने जि. प. व पं.स. सदस्यत्व रद्द करण्याबाबत जि. प. कडे अभिप्राय मागितला आहे. मात्र, एक पत्र व नंतर स्मरणपत्र देऊनही जिल्हा परिषदेकडून हा अभिप्राय दिला जात नसल्याने नगरपंचायत बाबतची पुढील कार्यवाही थंडावली आहे. मात्र, असे पत्र आम्हाला मिळाले नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
ग्रामपंचायतीचे नगरपंचायत रूपांतर होण्याबाबत उद्घोषणा झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतून ८२ पैकी ८१ जणांनी माघार घेतली. उद्घोषणेबाबत ३१ जानेवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या हरकतींची मुदतही संपली आहे, त्यामुळे आता नगरपंचायतीची घोषणा व मंजुरी मिळेल व कार्यवाही सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान,शासनाकडून जि. प. प्रशासनाला पाठविण्यात आलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
स्मरणपत्र आणि ही माहिती मागविली
जिल्हा परिषदेला २१ जानेवारीला नगर विकास विभागाकडून पत्र पाठवण्यात आले होते, मात्र अहवाल प्राप्त न झाल्याने १ फेब्रुवारी रोजी पुन्हा जिल्हा परिषद विभागाच्या अधिकारी यांना स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे. नगरपंचायतीमध्ये जी गावे समाविष्ट करावयाची आहे त्या गावांच्या संबंधित ग्रामपंचायतीचा व ग्रामसभेचा हद्दवाढ करण्याबाबतचा मूळ ठराव, ग्रामपंचायतीचे ठराव यासह आदींबाबत माहिती मागवण्यात आली आहे.
कोट
नगरपंचायत रूपांतर झाल्यानंतर जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्यत्वाची पद संपुष्टात येणे, हद्दवाढ आदी बाबींचा अभिप्राय मागवला जातो. जी माहिती शासन मागेल ती त्वरित सादर करण्यात येईल, मात्र याबाबत कुठलेही पत्र अद्याप जिल्हा परिषद विभागाला प्राप्त झालेले नाही. ते पत्र प्राप्त होताच सर्व माहिती अहवाल शासनाला देण्यात येईल. - के. बी. रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.