लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात फरार असलेला डॉ. तौफिक शेख हाच मुख्य सूत्रधार असून त्याला अटक केल्यावरच काही गोष्टींचा उलगडा होणार आहे. दरम्यान, मेडिकल क्षेत्रात दबदबा असलेले तसेच सरकारी यंत्रणेत कार्यरत असलेले काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. याबाबतची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
मुख्य सूत्रधारच फरार असल्याने या प्रकरणात चालनाच मिळत नाही, त्यामुळे तूर्तास तरी ही चौकशी थांबलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तौफिक शेख हा तांबापुरातील हयात हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. त्याच्याकडेच रेमडेसिवीरचा साठा होता. त्याच्याकडून टोळीला विक्रीसाठी इंजेक्शन मिळायचे. डॉ. शेख हा १५ ते १८ हजारात एक इजेेक्शन द्यायचा. हेच इंजेक्शन २० हजारात टोळीतील दुसऱ्यापर्यंत पोहोचविले जायचे. अशा पद्धतीने टोळीतील प्रत्येक जण एका इंजेक्शनमागे ३ हजार रुपये कमवित होता. त्यामुळे टोळीतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत इंजेक्शनची किंमत ३० ते ३५ हजार रुपये होत असे, यानंतर ज्याला आवश्यक आहे अशा नातेवाइकाला तब्बल २५ ते ३० हजार रुपयात रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.
शहरातून ठिकठिकाणी काळ्या बाजारात रेमडेसिविरची चढ्या दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस दलाने पर्दाफाश केला. या टोळीने केवळ जळगाव शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
बड्या हस्तींपर्यंत धागेदोरे?
रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात बड्या हस्तीपर्यंत धागेदोरे पोहोचण्याची शक्यता पोलीस यंत्रणेकडून वर्तवली जात आहे. यात सरकारी रुग्णालय, मेडिकल तसेच राजकीय क्षेत्राशी संबंधित काही लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. फरार डॉक्टर हा राजकीय लोकांच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत या हे प्रकरण गुलदस्त्यातच राहील, असेही सांगितले जात आहे.
कोट...
फरार डॉक्टरचा शोध सुरू आहे. तो सापडला की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तपासही स्वतंत्र सुरू आहे. अटकेतील संशयितांकडून फारशी माहिती मिळाली नाही.
- मनोज वाघमारे, तपासाधिकारी