जळगाव : चौकशी अहवाल अनुकूल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकाऱ्याला मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी संबंधितांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात लोकसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.दिवाळी पाडव्याची सुट्टी असताना देखील सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (५४) व विस्ताराधिकारी पद्माकर बुधा अहिरे (५३) या जळगाव पंचायत समितीतील दोन्ही अधिकाऱ्यांना पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. पाडव्याची सुट्टी असताना देखील लाच स्वीकारणे अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे सुनील वानखडे, राकेश दुसाने सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, रमेश ठाकूर आदींनी केली.
एसीबीचे कारवाईचे फटाके, सहाय्यक बीडिओसह विस्तार अधिकारी जाळ्यात; पाच लाखांची मागितली लाच
By विजय.सैतवाल | Published: November 14, 2023 10:28 PM