लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सर्वोदय शिक्षण संस्था आणि सावदा मर्चंट पतसंस्था या दोन प्रमुख सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने स्थगित केल्या होत्या. त्यावेळी या दोन्ही सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने निवडणुकांची स्थिती कायम राहिली. आता पुन्हा या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
बुधवारी सहकार खात्याची राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यात जळगाव जिल्ह्यातील सर्वोदय शिक्षण आणि सावदा मर्चंट या दोन प्रमुख सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. त्यात सावदा मर्चंटचे निवडणुक अधिकारी निश्चीत करण्यात आले आहे. तर सर्वोदय संस्थेच्या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत.
इतर सहकारी संस्थांच्या निवडणुक कार्यक्रमाबाबत अद्याप शासन स्तरावरून कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिली आहे.
१११८ संस्थांची निवडणुक
जिल्ह्यातील तब्बल १११८ सहकारी संस्थांची निवडणुक लवकरच होणार आहे. या संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत उलटून गेली आहे. यात जिल्ह्यातील प्रमुख सहकारी संस्था मराठा विद्या प्रसारक संस्था, जळगाव जिल्हा सहकारी बँक, जिल्हा खरेदी विक्री संघ, जिल्हा दुध संघ, जळगाव जनता बँक, सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी, (ग.स.) यांचा देखील समावेश आहे. यात अनेक मोठमोठ्या संस्थांचा समावेश आहे. यात अ वर्ग संस्था सहा, ब वर्ग संस्था ४४९, क वर्ग संस्था ४५९ आणि ड वर्ग २०४ संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत उलटून गेली आहे. मात्र अद्यापही त्यांची निवडणुक लागलेली नाही. आता लॉकडाऊन चे निर्बंध शिथील करण्यात आल्याने या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे.